हुशार असताना दहावीत कमी गुण कसे काय मिळाले ? खरं कारण...




लोक आजही विचारतात - हुशार असताना दहावीत कमी गुण कसे काय मिळाले?

याचं उत्तर मी आजवर कोणाला मनमोकळं दिलं नव्हतं. आज देतोय...

ही गोष्ट आहे सन २००० मधली. दहावीच्या परीक्षेसाठीचे केंद्र आमच्या गावात (कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) नव्हते. त्यामुळे जवळच्याच निमगाव या गावात परीक्षा केंद्र असल्याने दररोज जीपने आम्ही सर्व मुलं, मुली परीक्षेसाठी निमगाव (ता. माढा) ला जायचो. पहिलाच पेपर द्यायला परीक्षा हॉलमध्ये शिरलो आणि कळलं, हे परीक्षा सेंटर कमी आणि गोंधळच जास्त आहे.

सगळीकडे कॉपीचा गोंधळ चालू होता. खिडकीतून आत पुस्तके, चिठ्ठ्या फेकल्या जात होत्या. काही शिक्षकच उभे राहून सांगत होते. मी आयुष्यात कधी कॉपी केली नव्हती, करायचीही नव्हती. आई वडील व गुरुजणांचे संस्कारच तसे होते. 

 त्या वातावरणात माझी भीती वाढली. 

त्याच हॉलमध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याचा मुलगाही परीक्षा देत होता. त्याला कॉपी पुरवण्यासाठी बाहेर अख्खी यंत्रणा काम करत होती. आम्ही बाकीचे विद्यार्थी फक्त बघत होतो. आम्हाला ओरडून सांगितलं जायचं - "गप्प बसा, पेपर लिहा."

एका बाजूला कॉपी करणाऱ्यांचा गोंधळ, दुसऱ्या बाजूला आमच्यासारख्या न कॉपी करणाऱ्यांवर दहशत. या सगळ्यात माझं लक्ष पेपरवरून विचलित झालं. हात थरथरत होते. पाठ केलेलं आठवत नव्हतं. हे एका पेपरपुरतं मर्यादित राहिलं नाही. तर तर प्रत्येक पेपरला हेच वातावरण होतं.

मी कॉपी केली नाही. आजही त्याचा मला अभिमान आहे. पण त्या घाबरलेल्या वातावरणाची किंमत मला माझ्या मार्कांच्या रूपात मोजावी लागली, हे निश्चित.

कमी गुण आले, पण एक मोठा धडा मिळाला - गर्दी चुकीच्या मार्गाने जात असेल, तरी आपण आपल्या मार्गावर ठाम राहायचं. गुण कमी आले तरी चालतील, पण मान खाली जायला नको.

आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा वाटतं - त्या दिवशी मी कॉपी केली असती तर कदाचित जास्त गुण मिळाले असते. पण आपण जगाला फसवू शकतो, पण स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही. जो स्वाभिमान मी आजपर्यंत जपलाय, तो कधीच मिळाला नसता. कमी गुण मिळाले म्हणून माझं काही अडलं नाही. 

तुमच्या सेंटरवरही असा अनुभव आलाय का? तुम्ही काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा...

क्रमशः ...

आपलाच ज्ञानदा 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

सूचनांचे स्वागत

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामात बदल हवाच